Penguin in byculla zoo BMC to charge Rs 100 per family to view Penguins

महापालिकेत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर

मुंबई महानगरपालिकेच्या जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात आलेल्या नव्या पाहुण्यांच्या दर्शनाला नागरिकांना इथून पुढे शंभराची नोट मोजावी लागणार आहे. येथे आलेल्या हम्बोल्ट जातींच्या पेंग्विनचे दर्शन गेले काही दिवस मोफत सुरू असले तरी येत्या काही दिवसांत त्यांच्या दर्शनासाठी शुल्क मोजावे लागेल. लहान मुलांना २५ रुपये आणि प्रौढांना १०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. शनिवारी महापालिकेत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र पालिका सभागृहाने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच पेंग्विन दर्शनासाठी शुल्क आकारता येणार आहे.

भायखळा येथील जिजामाता भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात आगमनापासूनच हम्बोल्ट जातीच्या पेंग्विन पक्ष्यांबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. गेले काही दिवस या पेंग्विन पक्ष्यांचे दर्शन पालिकेने मोफत सुरू ठेवले आहे. त्यामुळे दररोज २५ हजारांहून अधिक नागरिक पेंग्विन पाहण्यासाठी येथे येत आहेत. हा आकडा आता जवळपास ५ लाखांहून पुढे गेला असून अजूनही नागरिक पेंग्विन पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र, आता हे मोफत दर्शन काही काळापुरतेच टिकणार आहे. कारण, शनिवारी यासंदर्भात महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

यावर शनिवारी निर्णय घेण्यात आला असून, सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ पर्यंत आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी ४ वाजेपर्यंत मुंबईकरांना पेंग्विन पाहता येतील. याशिवाय, ‘मॉìनग वॉक’च्या पासमध्येही पाच पटीने वाढ करण्याचा निर्णय या बठकीत घेण्यात आला. यापूर्वी ‘मॉìनग वॉक’ला येणाऱ्या लोकांकडून महिन्याला ३० रुपये आकारण्यात येते होते. पण आता यासाठी १५० रुपये आकारण्यात येतील. दरम्यान, गटनेत्यांच्या बैठकीत मंजूर झालेला हा प्रस्ताव सभागृहापुढे मांडण्यात येईल. सभागृहात यावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यामुळे ही दरवाढ काही दिवसांनी होणार असून सध्या तरी पेंग्विन दर्शन मोफतच आहे. याबाबत उद्यानाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी सभागृहापुढे चर्चा होऊन निर्णय होईल, मगच दरवाढीबाबत ठोस सांगता येईल असे स्पष्ट होईल.

निवडणुकीमुळे प्रस्ताव लांबणीवर

या प्रस्तावानुसार, आत पेंग्विन दर्शनासाठी लहान मुलांना २५ रुपये, तर प्रौढांना १०० रुपये आकारण्यात येतील. तर दोन मुले व आई-वडील एकत्र आल्यास चौघांचे मिळून १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. सध्या उद्यानात प्रवेशासाठी मुलांसाठी २ रुपये, तर प्रौढांसाठी ५ रुपये आकारण्यात येतात. मात्र पेंग्विन दर्शनासाठी यामध्ये घसघशीत वाढ करण्यात आल्याचे समजते आहे. या दरवाढीच्या प्रस्तावावर निवडणुकीपूर्वीच निर्णय घेण्यात येणार होता. परंतु याचा निवडणुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी सेनेकडून हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याच्या चर्चेलाही या प्रस्तावाच्या निमित्ताने उधाण आले आहे.

सध्याचे पेंग्विनदर्शन शुल्क

मुले – २ रु.

प्रौढ – ५ रु.

नवीन शुल्क

मुले – २५ रु.

प्रौंढ – १०० रु.

दोन मुले व आई-वडील एकत्र आल्यास – १०० रु.

First Published on April 3, 2017 3:21 am
Courtesy: http://indianexpress.com

Source: http://www.loksatta.com/mumbai-news/penguin-in-byculla-zoo-bmc-to-charge-rs-100-per-family-to-view-penguins-1445017/